15/07/2026
सातारा जिल्ह्यातील श्री सन्मित्र नाट्य मंडळ, गोंदवले खुर्द हे मंडळ गेली सुमारे ३५ ते ४० वर्षे अत्यंत सातत्याने व निस्वार्थ भावनेने राज्यस्तरीय दोन अंकी नाट्य महोत्सवाचे आयोजन करीत आहे. ग्रामीण भागात इतक्या प्रदीर्घ काळ अखंडपणे सुरू असलेला हा नाट्य महोत्सव महाराष्ट्रातील एक उल्लेखनीय सांस्कृतिक उपक्रम आहे.
मला स्वतःला या नाट्य महोत्सवात गेली वीस-बावीस वर्षे सातत्याने सहभागी होण्याचा योग आला आहे. 'नाथ हा माझा ' या माझ्या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुद्धा पटकावले होते. या काळात सलग दोन तीन वर्षे पहिल्या तीन नंबरात येण्याचा पराक्रम माझ्या नाट्यसंस्थेने केला होता. पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात नाथ ची टीम सहभागी झाली होती आणि या गावाशी नाते अधिक दृढ झाले. या काळात या महोत्सवाची वाढ, त्यामागील कार्यकर्त्यांची तळमळ आणि रंगभूमीप्रती असलेली त्यांची निष्ठा जवळून अनुभवण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध नामांकित नाट्यसंस्था सहभाग नोंदवतात. दरवर्षी सुमारे सात ते आठ दर्जेदार दोन अंकी नाटके आठवडाभर सादर केली जातात.
कृष्णजन्माष्टमी उत्सवानिमित्त गोंदवले खुर्द येथे भरविण्यात येणाऱ्या यात्रेतील धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, कुस्ती स्पर्धा, शाळेचे स्नेहसंमेलन अशा विविध उपक्रमांबरोबर हा नाट्य महोत्सव गावाच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे. दररोज सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणारा प्रत्येक प्रयोग परिसरातील रसिकांना दर्जेदार नाट्यकलेचा आनंद देत असतो.
विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण महोत्सव मोकळ्या खुल्या रंगमंचावर, अनेक भौतिक सुविधांच्या अभावात आयोजित केला जातो. तरीही प्रत्येक वर्षी या महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात मंडळाला यश येते. या कार्यामागे मंडळाचे अध्यक्ष श्री. अर्जुनराव शेडगे, उपाध्यक्ष श्री. जिजाबा शेडगे, कार्यवाह श्री. रमेश खांडेकर तसेच सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे अथक परिश्रम आहेत.
ही मंडळी दिवसभर शेतीची व रोजीरोटीची कामे करूनही रात्री उशिरापर्यंत कलाकारांची निवास व्यवस्था, भोजन, चहापान, रंगभूषा व प्रयोगासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात. पन्नाशी-साठी ओलांडलेले हे कार्यकर्ते आजही तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाने कार्य करीत असून, "सन्मित्र" हे नाव प्रत्यक्ष कृतीतून सार्थ ठरवत आहेत.
या महोत्सवाला अनेकदा प्रतिकूल परिस्थितीचाही सामना करावा लागला आहे. पावसाची भुरभुर, वीजपुरवठ्यातील अडचणी किंवा इतर नैसर्गिक संकटे यांमुळे अनेक वेळा अडथळे निर्माण झाले, तरीही या स्पर्धेची परंपरा कधीही खंडित झालेली नाही. ही बाब मंडळाच्या जिद्दीचे आणि सांस्कृतिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
गेल्या अनेक वर्षांत विविध लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी या खुल्या रंगमंचाचे सुसज्ज लघु नाट्यगृहात रूपांतर, कलाकारांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे, तसेच सांस्कृतिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची अनेक आश्वासने दिली. मात्र ती बहुतेक वेळा केवळ व्यासपीठावरील भाषणांपुरतीच मर्यादित राहिली असून प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. तरीदेखील श्री सन्मित्र नाट्य मंडळाने कोणतीही अपेक्षा न ठेवता आपली सांस्कृतिक परंपरा आजतागायत जपली आहे.
ग्रामीण भागात रंगभूमी जिवंत ठेवणे, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, महाराष्ट्रातील विविध नाट्यसंस्थांना एकत्र आणणे आणि सांस्कृतिक चळवळ सातत्याने सुरू ठेवणे, हे या मंडळाचे कार्य अत्यंत स्तुत्य, प्रेरणादायी व समाजहिताचे आहे.
त्यामुळे मधुमिता सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक संस्था, सातारा यांच्या वतीने मी श्री सन्मित्र नाट्य मंडळ, गोंदवले खुर्द यांच्या सांस्कृतिक कार्यास, तसेच त्यांच्या भावी विकास योजनांना संपूर्ण अनुमोदन व भक्कम शिफारस करीत आहे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, सांस्कृतिक कार्य विभाग तसेच विविध निधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांनी या मंडळाच्या प्रस्तावांचा सहानुभूतीपूर्वक व प्राधान्याने विचार करून आवश्यक आर्थिक व पायाभूत सहकार्य करावे, अशी नम्र विनंती आहे.
या मंडळाने गेल्या चार दशकांत जपलेली नाट्यसेवेची परंपरा अधिक सक्षम व्हावी, ग्रामीण भागात दर्जेदार रंगभूमी अधिक बळकट व्हावी आणि पुढील पिढ्यांनाही या सांस्कृतिक वारशाचा लाभ मिळावा, हीच अपेक्षा.
अभिजित वाईकर
अध्यक्ष
मधुमिता सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक संस्था, सातारा